आमदार स्व. धुळाप्पाण्णा नवले यांचा स्वभाव अतिशय शांत व संयमी, प्रेरणादायी कार्य : खासदार विशाल पाटील
अंकलखोप येथे माजी आमदार स्व. धूळाप्पाण्णा नवले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम : लोकनेते जे के बापू जाधव यांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी/अंकलखोप :- “थोर स्वातंत्र्य सेनानी व अंकलखोपचे सुपुत्र माजी आमदार (स्व.) धुळाप्पाण्णा नवले यांचा स्वभाव अतिशय शांत व संयमी होता. स्व. वसंतदादांबरोबर ते सावली सारखे असायचे. दादांच्या अखेरच्या दिवसात त्यांचे जवळचे मित्र म्हणजे धुळपाण्णा नवले होते, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले.थोर स्वातंत्र्य सेनानी, अंकलखोप गावचे सुपुत्र माजी आमदार स्व. धूळाप्पाण्णा नवले यांच्या 37 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार विशाल पाटील यांनी सांगितले की, 1963 ते 1972 या कालावधीमध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्यरत राहिले.यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कमिट्यावर महत्त्वाची कामे केली. 1982 साली महाराष्ट्राचे दोन दिग्गज नेते वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये असणारा टोकाचा संघर्ष संपुष्टात आणून, राजकीय दुरावा, मतभेद मिटवून त्यांचे एकीकरणाचे महत्त्वपूर्ण काम अण्णांनी केले.
यावेळी धुळाप्पाण्णा नवले यांच्या जीवनपट शिलालेखाचे अनावरण देखील खा. विशाल आणि पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कृष्णाकाठ उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष जे.के बापू जाधव, राजारामबापू सहकारी साखर कारखानाचे संचालक प्रकाश उर्फ बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी घनश्याम सूर्यवंशी होते.
बाळासाहेब पवार म्हणाले, ” स्व. अण्णांनी 1930-32 पासून 1988 पर्यंत विविध सामाजिक कार्यातून तसेच, राजकारण सत्याग्रह यामध्ये सक्रिय भाग घेऊन 1942 साली झालेल्या चाळीसगाव चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले या काळात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला. 1944 झाली तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढा चालू ठेवून राष्ट्र उभारणी कार्यास वाहून घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन सुरू करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व . धुळाप्पाण्णा नवले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक वसंतराव नवले यांनी केले. यावेळी स्व . धुळाप्पाण्णा नवले यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. घनश्याम सूर्यवंशी , सतीश पाटील, बाळासाहेब मगदूम यांनी अण्णांच्या कार्याची माहिती दिली व काही प्रसंगही सांगितले.
यावेळी गावातील दोन शाळांमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. चित्रफीत तयार करणारे प्रदीप सुतार व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आप्पासाहेब पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी अंकलखोप गावच्या सरपंच राजश्री सावंत, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, शामराव पाटील, बापूसाहेब पाटील , अंकलखोप विकास सोसायटीचे अध्यक्ष जगन्नाथ मिरजकर , राजेंद्र पाटील, अजित शिरगावकर,ज्ञ शामराव नवले , चंद्रकांत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर , ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य , विकास सोसायटी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ , कर्मवीर पतसंस्थेचे कर्मचारी, उपस्थित होते.सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी केले अजितराव शिरगावकर यांनी आभार मानले .
बाजीराव आप्पा सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल नवले, विजय नवले, कर्मवीर पतसंस्था कर्मचारी यांनी संयोजन केले.