आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

1 एप्रिलपासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी : – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

 

दर्पण न्यूज मुंबई,  : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 25 कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिरोधकता निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरियावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासह 2017 मध्ये विविध निर्णय घेण्यात आले होते. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया निर्मूलन टास्क फोर्स सुरू करण्यात आला होता. त्यानुसार, टास्क फोर्सने राष्ट्रीय आणि जागतिक तज्ज्ञांच्या शिफारशींचा समावेश करून गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. गडचिरोलीत येत्या 1 एप्रिल, 2025 पासून या आराखड्यातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेट्स फाउंडेशन आणि सन फार्माचेही सहकार्य

गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाच्या या कामासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यामार्फतही महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सन फार्मा/एफडीईसी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. सन फार्मा कंपनीच्या FDEC ने मलेरिया निर्मूलनासाठी मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात काम केले आहे. मलेरिया दूर करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गांचे मॉडेल विकसित केले आहे. मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, फील्ड प्रोग्रामचे निरीक्षण करणे, तांत्रिक पुनरावलोकन यासारख्या विविध गोष्टींमध्ये सन फार्मा कंपनीमार्फत मदत करण्यात येणार आहे. गेट्स फाउंडेशन आणि सन फार्मा यांच्या योगदानामुळे गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण मदत मिळू शकेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!