नागपूर शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.
—————******———————-
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
नागपूर : राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन‘ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.
आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे, पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.
संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.