सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा हाच ध्यास

दर्पण न्यूज सांगली : मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते. या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. जिल्हा नियोजन समितीतून आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात असल्याने सांगलीसह लगतच्या जिल्ह्यातील व परराज्यातील रूग्णांनाही याचा लाभ होत आहे.
याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नुकतेच एम आर आय थ्री टेस्ला हे अद्ययावत यंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे सुरू करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे अद्ययावत मशिन प्रथमच कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे रूग्णांस कमी वेळेत व उच्च दर्जाची एम. आर. आय. चाचणी करून देणे शक्य झाले आहे. शस्त्रक्रिया विभाग व अतिदक्षता विभाग जुन्या पद्धतीचा होता. त्याचे रूपांतर मॉड्युलर ओ. टी. व मॉड्युलर आय. सी. यु. मध्ये करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हृदयरोग रूग्णांच्या वाढत्या समस्येकरिता उपाययोजना म्हणून शासनाने मंजूर केलेल्या अत्याधुनिक कॅथलॅबच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून रक्कम रूपये 10 कोटी 48 लाख 50 हजार इतक्या रकमेचे 128 स्लाईस सी. टी स्कॅन हे अद्ययावत यंत्र पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे रूग्णसेवेत कार्यरत आहे. या रूग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाकडून 22 कोटी 98 लाख इतक्या रकमेचे 6 नग अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षांना (मॉड्युलर ओ. टी.) मान्यता मिळाली असून, त्यांचे काम गतीने सुरू आहे. शासकीय रुग्णालय, मिरज येथे अत्याधुनिक 10 शस्त्रक्रिया कक्षांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी चार कक्षांचे काम पूर्ण असून, उरलेल्या सहा कक्षांचे काम गतीने सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव म्हणाले, शस्त्रक्रिया विभागातील आवश्यक वस्तु व कपड्यांचे निर्जंतुकीकरण (सी. एस. एस. डी) साठी 18 कोटी, 45 लाख रकमेचा प्रस्ताव मंजूर झाला असून, सदर यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे 500 खाटांची नवीन इमारत, डॉक्टरांसाठी वसतिगृह आदि बाबींसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून शासनस्तरावर पुढील कार्यवाही सुरू आहे.
ग्रामीण भागातही चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे जिल्ह्यातील 121 हिमोफिलियाग्रस्त रुग्णांकरिता मोफत डे केअर सेंटर स्थापन केले असून, रूग्णांना सर्व फॅक्टर मोफत उपलब्ध केले जात आहेत. उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे 10 खाटांचे अद्ययावत मोफत डायलेसिस सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर येथे मोफत 2 डी इको तपासणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून या आर्थिक वर्षात मध्ये 135 हृदय शस्त्रक्रिया तसेच जवळपास 3 हजार 307 अन्य शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. 100 खाटांचे स्वतंत्र जिल्हा रूग्णालय व 100 खाटांच्या महिला रूग्णालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ म्हणाले, जिल्हा परिषदेच्या स्मार्ट पीएचसी उपक्रमातून 48 प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळ दिले आहे. सार्वजनिक आरोग्य निर्देशांकमध्ये मागील संपूर्ण वर्षात सांगली जिल्हा राज्यात प्रथम तीन क्रमांकात स्थान पटकावत आहे. एन ए बी एच हे आरोग्य सेवेतील सर्वोच्च मानांकन आहे. राज्यातील 8 आरोग्य संस्थांना हे मानांकन मिळाले आहे. त्यातील पाच आरोग्य संस्था एकट्या सांगली जिल्ह्यातील आहेत. यामध्ये येडेनिपाणी, कसबे डिग्रज, आमणापूर, भवानीनगर आणि बुधगाव या पाच आरोग्य संस्थांना एन ए बी एच प्रमाणित आरोग्य संस्था प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ई संजीवनी आशा कार्यक्रमात चालू वर्षी सव्वा दोन लाख 35 हजार अधिक रूग्णांनी ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेतला आहे. या योजनेत सांगली जिल्हा देशात अग्रेसर आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृवंदना योजना व जननी सुरक्षा योजना यांचीही प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचे समन्वयक रघुवीर हलवाई म्हणाले, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून 2021 साली जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या स्थापनेपासून 57 हजारहून अधिक रूग्णांची तपासणी करून त्यांच्या 16 लाखहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. या माध्यमातून रूग्णांना गोरगरीब व गरजू अल्प दरात तपासण्यांचा लाभ होत आहे.
एकूणच आरोग्य यंत्रणेच्या या सर्व कामांमधून सर्वांसाठी दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा हा शासनाचा ध्यास असल्याचे दिसून येते.