सांगली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव

सांगली : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली यांच्यामार्फत शासकीय / स्वयंसेवी संस्था व शाळांमधील बालकांसाठी दि. ०६ ते ०८ जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित कै. दादू काका भिडे मुलांचे निरीक्षण/बालगृह व सौ. सुंदरबाई मालु मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह, सांगली या ठिकाणी हा बाल महोत्सव होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्था तसेच शाळांमधील बालकांसाठी बाल मेळावा, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच, मुला / मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्यासाठी सांघिक खेळ व वैयक्तिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा, मैदानी, बैठे खेळ अशा विविध खेळ प्रकारांमध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील शासकीय, स्वयंसेवी संस्था व शाळांमधील मुले / मुली स्पर्धक / अधिकारी / कर्मचारी इ. सहभागी होणार असून, दि. ०६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.