औदुंबर येथील 83व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर ; कविसंमेलन अध्यक्षपदी लता ऐवळे- कदम

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या 83 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या अभ्यासिका सुप्रसिद्ध लेखिका व दिल्ली येथे भरणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर सांगली यांची व सकाळच्या सत्रातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री लता ऐवळे अंकलखोप यांची निवड झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी यांनी दिली.
हे संमेलन औदुंबर येथे मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांति दिवशी भरवण्यात येणार आहे डॉक्टर तारा भवाळकर यांची 44 पुस्तके प्रसिद्ध झाली असून महामाया मिथक आणि नाटक लोकसंचित लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, नीरगाठ लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, सीतायन संस्कृतीची शोधयात्रा आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत .
डॉक्टर तारा भवळकर यांना सर्वोत्कृष्ट प्रबंध पुणे विद्यापीठ, मराठी साहित्य परिषदेचा गोखले पुरस्कार, वाडःमय चर्चा मंडळ बेळगावचा पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा रत्नशारदा पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन चा पुरस्कार इत्यादी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपाध्यक्ष, म.सा. प. पुणे उपाध्यक्ष, स्त्री अभ्यास मंडळ सदस्य शिवाजी विद्यापीठ, विश्वकोश मंडळ सदस्य, साहित्य संस्कृती मंडळ सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार निवड समितीच्या सदस्य आहेत.
यावेळी विविध वाडःमय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक सुभाष कवडे, प्राध्यापक संतोष काळे व विजय जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अनुवादासाठी साहित्य अकादमीचा विशेष पुरस्कार लाभलेल्या सोनाली नवांगुळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच नवोदित कवींच्या काव्यसंग्रहाला पद्मश्री कवी सुधांशू पुरस्कार व सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार देण्यात देण्यात येणार आहेत.
सकाळच्या सत्रात बारा ते तीन या वेळेत कवी संमेलन होणार असून दुपारी साडेतीन ते सहा या वेळेत मुख्य अधिवेशन होणार आहे तरी सर्वांनी यावे असे आवाहन मंडलाने केले आहे.