महाराष्ट्र

स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 

 

        सांगली : महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात. स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रती महिना दीड हजार रुपये मानधनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

          मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे  यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृष्यप्रणालीव्दारे मिरज बालगंधर्व नाट्यमंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

      ते पुढे म्हणाले, शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार या सर्वांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. हे शासन सर्वसामान्यांचे असून ते शेवटच्या घटकांपर्यंत कार्यरत राहणार आहे. स्त्रियांनी बँकेतून पैसे काढण्याची घाई करू नये. या पैशाचा विनियोग कुटुंबीयांसाठी तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करावा, असे आवाहन केले.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेली दोन महिने प्रशासन अव्याहतपणे प्रयत्न करीत आहे. दि. 14 ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून यामध्ये बँकर्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले.

         या प्रसंगी पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात 10 महिलांना धनादेश व रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे चार लाख 59 हजार इतके अर्ज आले असून त्यापैकी सुमारे चार लाख 45 हजार अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच या कामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक लाभार्थ्यांना पैसे वर्ग केल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी अश्विनी संकपाळ व वैष्णवी राजपूत या पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास नीता केळकर, स्वाती शिंदे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!