शासकीय शालेय मनपास्तरीय खेळांचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार ; आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांचे प्रतिपादन

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आयोजित सेंट झेवियर्स हायस्कूल येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या सहकार्याने शासकीय शालेय कोल्हापूर मनपास्तरीय 14, 17 व 19 वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या दिमाखात प्रारंभ झाल्या.
आज सुरू झालेल्या चौदा वर्षाखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी व सेंट झेवियर्स हायस्कूल मुख्याध्यापक फादर अँड्रू फर्नांडिस यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी डी सी कुंभार, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सयाजी पाटील, अल्ताफ कुरेशी, समन्वयक शिक्षक किरण खटावकर, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, वरिष्ठ राष्ट्रीय पंच आरती मोदी,अनिश गांधी, सचिन भाट उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त मंजूलक्ष्मी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, *कोल्हापूरची क्रीडा परंपरा खूप मोठी आहे. 50 विविध खेळाच्या शासकीय शालेय मनपास्तरीय स्पर्धा महानगरपालिका दरवर्षी आयोजित करते. या सर्व खेळांचा दर्जा वाढवण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले*
*चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले व सचिव मनिष मारूलकर व त्यांचे पदाधिकार्यानी विशेष प्रयत्न करून सातत्याने कोल्हापुरात विविध बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करुन देतात अशा संघटनांना महानगरपालिकेचे निश्चितपणे पाठबळ राहील, विविध खेळाद्वारे मुलांचे मन आणि शरीर सुदृढ होण्यासाठी पालकांनी खेळासाठी मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे.असा पालकांना सल्ला दिला* चेस असोसिएशन कोल्हापूरच्या सहकार्याने होणाऱ्या शालेय मनपास्तरीय जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न करून या स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी नेहमीप्रमाणे सहकार्य करु असे भरत चौगुले म्हणाले.
आज सुरू झालेल्या चौदा वर्षाखालील मुला मुलींच्या गटात कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळेमधून मुलांच्या गटात एकशे चौऱ्यांशी तर मुलींच्या गटात छप्पन असे एकूण 240 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत मुलांच्या गटात स्विस् लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्या होणार आहेत तर मुलींच्या गटात एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अर्णव पोर्लेकर, प्रथमेश व्यापारी, सर्वेश पोतदार, अर्णव पाटील, अन्वय भिवरे, अर्णव र्हाटवळ, वेदांत देसाई व ऋग्वेद पाटील हे आठ जण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अग्रमानांकित आरव पाटील व आदित्य घाटे यांच्यासह चाळीस जण तीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. मुलींच्या गटात चौथ्या फेरीनंतर हर्षदा सूर्यवंशी पाटील, आरोही सायेकर व आराध्या सावंत या तिघीजणी चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर शरयू शिंदे व राणी कोळी या दोघी साडेतीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.