महाराष्ट्र

उस्ताद झाकीर हुसेन यांना ; राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

 

उस्ताद झाकीर हुसेन यांनी जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

 – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण  उस्ताद  झाकीर  हुसेन  यांच्या  निधनाबद्दल  तीव्र  दुःख  व्यक्त  केले आहे.

उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे.

उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले.

प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अशा दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे  तबला  वादन  ऐकून  लाखो  युवक  युवती  तबला  वादनाकडे  वळले.

भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबला वादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगीतकार म्हणून आपला अमीट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केले.

त्यांच्या निधनामुळे भारताने-विशेषतः महाराष्ट्राने आपला अत्यंत लाडका सुपुत्र व संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा गमावला आहे. झाकीर हुसेन यांचे संगीत चिरंतन राहील व संगीतकारांच्या पिढ्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित करील. या दुःखद प्रसंगी मी दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय व लाखो संगीत चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या  शोकसंदेशात  म्हटले आहे.

 

 __________________________

तबल्याचा ताल हरपला!

झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई :प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याच्या ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबल्याच्या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील. वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती.

 तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

——————————————-

 

कलाविश्वाचा ताल चुकला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली

 

नागपूर,: भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते.

उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला. कुरेशी घराणे हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखे अढळ होते. अतिशय साधी राहाणी, आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचे पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असे आता म्हणावे लागेल.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!