सांगली येथे सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा

सांगली : भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सवी वर्षात “घर घर संविधान” हा उपक्रम साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमिवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाची जागरूकता वाढविण्याकरिता सांगली एस. टी. स्टँड परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस उपाधिक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. एस. टी. स्टँड परिसर सांगली – छ. शिवाजी महाराज पुतळा मार्गे – स्टेशन चौक – जिल्हाधिकारी निवास – आमराई उद्यान समोरून – कॉलेज कॉर्नर – माधवनगर सर्किट हाऊस मार्गे ही रॅली निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड सांगली येथे रॅलीची सांगता करण्यात आली. 26 नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधून सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका परिसरात संविधानाचा जागर करण्यासाठी समता रथ फिरविण्यात आला.
समाजकल्याण विभागाच्या सामाजिक न्याय सभागृहात प्रा. प्रज्ञावंत कांबळे यांचे संविधानविषयक जनजागृती व प्राथमिक माहिती या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती नंदिनी आवडे होत्या. प्रज्ञावंत कांबळे यांनी भारतीय संविधानाची कलमनिहाय माहिती देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टिकोन, समानता, बंधुता, मानवता, स्वातंत्र्य या घटकांनी ओतप्रोत अशी संविधानाची निर्मिती केली आहे, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीमती आवडे यांनी ज्या उदात्त ध्येयाने भारतीय संविधान बनविले, ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन केले. कार्यक्रमात अनुसूचित जाती व उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नितीन उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक संचालिका श्रीमती धनश्री भांबुरे, उपायुक्त तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव नागनाथ चौगुले, संशोधन अधिकारी मेघराज भाते आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाकडील शासकीय अधिकारी, शासकीय वसतिगृहांचे अधिक्षक, कर्मचारी वृंद, पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
__________________
जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा
सांगली, : संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारात संविधान स्तंभास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.