कोल्हापूरात गणेश मंडळात फुट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न; राज्य नियोजन मंङळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे प्रतिपादन

कोल्हापूर ः अनिल पाटील
संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ या नावाने मंडळ नोंदणीकृत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव निर्विघ्नपणे मोठ्या धार्मिकतने आणि शांततेत साजरा करण्यात येत आहे. परंतु मंडळात फुट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग उबाठा गटाच्या विघ्नसंतोषी व्यक्तींकडून होत आहे. चांगल्या कामात नेहमीच अडथळा आणून कोल्हापूरच्या जनतेला वेठीस धरण्याचे काम चांडाळचौकडी कडून सुरु आहे. अशा विघ्नसंतोषी लोकांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, यावर्षी छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या नांवे अध्यक्ष कपिल केसरकर यांनी दि.२८/०८/२०२३ रोजी गणेशोत्सव मंडप उभारण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून त्याचे शासकीय शुल्क भरण्यात आले होते. परंतु, मंडळाच्या वतीने नियोजित केलेल्या गणेशोत्सवात गुंडप्रवृत्तीच्या विघ्नसंतोषी व्यक्तीने मंडळाच्या कार्यकारणी मध्ये फुट पाडून छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ हे नाव मिटविण्याचा प्रयत्न केला. मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंडपांविरोधात काहीजनांना धमकावून उपोषण, आत्मदहन करण्याचा ईशारा देण्यास भाग पाडण्यात आले. मंडळातील वाद मिटला होता. परंतु, उबाठा गटाच्या विघ्नसंतोषी लोकांना हे पचनी पडले नाही.
श्री गणेश आम्हा समस्त हिंदू जणांना पूजनीय आहेत. श्री गणेशाच्या पूजेने सर्वच शुभकार्याची सुरवात केली जाते. त्यामुळे श्री गणेशाच्या मूर्तीची विटंबना करणे हे आमच्या रक्तात नाही. पण, कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना उबाठा गटाच्या विघ्नसंतोषी लोकांनी राजकीय स्वार्थासाठी श्री गणेश मूर्तीची प्रतिस्थापना करण्याचा प्रयत्न केला. निव्वळ राजकारणासाठीच विरोधकांचा हा खेळ सुरु असून, श्री गणेशाची विटंबना नको म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेत छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या मंडप सोडून दुसऱ्या ठिकाणी श्री गणेश मूर्ती बसविण्यास संमती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कपिल केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे काम सुरु असून, या मंडळासह शहरातील इतर मंडळातही वाद लावून राजकीय स्वार्थ साधण्याचा केविलवाणा उद्योग उबाठाच्या चांडाळचौकडीने सुरु केला आहे हे कोल्हापूरवासियांना दिसत आहे. श्री गणरायाची विटंबना नको म्हणून आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. उबाठा गटानेही श्री गणरायाची विटंबना होईल असे कृत्य करू नये अन्यथा गाठ आमच्याशी असल्याचा इशाराही दिला.
ते पुढे म्हणाले कि, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.मा.श्री.दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होत आहे. परंतु, सातत्याने चुकीच्या मार्गाने विरोध करून कोल्हापूरच्या विकासाला आणि जनतेला वेठीस धरण्याचे काम तीन-चार लोकांकडून होत आहे. त्यातील हद्दपारीची नोटीस निघणाऱ्या गुंडप्रवृतीच्या व्यक्तीकडून शहरातील मंडळात वाद लावण्याचा नवीन उद्योग सुरु केला आहे. १५ दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळास प्रशासनाकडून श्री गणरायाची मूर्ती प्रतिस्थापना करण्यास परवानगी मिळाली असताना “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना” प्रमाणे गुंडप्रवृत्तीच्या विघ्नसंतोषी व्यक्तीने गोंधळ निर्माण केला. परंतु आम्ही संयम ठेवला आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, अंगावर आला तर शिंगावर घेवू. गेले काही दिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे कृत्य उबाठाच्या चांडाळचौकडी करून होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पोलीस प्रशासनाने तयार करावा, अशा विघ्नसंतोषी लोकांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत मोकाची कारवाई प्रशासनाने करावी आणि कोल्हापूरकरांना या सेटलमेंट चांडाळचौकडीच्या त्रासातून मुक्त करावे, असे त्यांनी सांगितले