बालवयातच नशामुक्तीचा संस्कार आवश्यक ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

दर्पण न्यूज सांगली : अमली पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात नशामुक्तीचे मोठे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शाळेत परिपाठवेळी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा देण्यात येत आहे. बालवयातच हा संस्कार घडल्यास भावी पिढी अमली पदार्थांच्या संकटापासून वाचेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व अकूज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संचलित सौ. आ. आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड व अकूज इंग्लिश मिडिअम स्कूल कुपवाड येथे आयोजित नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिणी घाणेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नशामुक्तीसाठी प्रबोधनाबरोबरच नशा करणारे आणि नशेच्या साहित्यांची विक्री करणाऱ्यांवर धाक निर्माण होण्यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. बालवयातच नशेच्या दुष्परिणामाबाबत मुलांच्यामध्ये जनजागृती केली तर भावी पिढी नशामुक्त घडेल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला व मुलीच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आहेच. पोलीस विभागामार्फतही पोलीस दादा व पोलीस दिदी, दामिनी अशा अभियानांतर्गत महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. पण, मुली व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय वयातच मुलींनी कराटे, ज्युडोचे प्रशिक्षण घ्यावे, जेणेकरुन त्यांना स्वसंरक्षण करता येईल. कराटे, ज्युडोसोबत परंपरागत लाठी काठीचेही प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व उपस्थितांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली. विद्यालयातील मुलींनी कराटेचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.