विक्रांत पाटील यांची आमदार पदी निवड: पनवेलला मिळाला नवीन आमदार

मुंबई पनवेल (विजय राणे) –: राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या नियुक्त्या मंगळवारी करण्यात आल्या. या आमदारांमध्ये भाजपचे युवानेते व पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचे नाव असल्याने त्यांच्या रूपाने पनवेलला नवीन आमदार मिळाला आहे.
भाजपने नुकतीच धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची खासदारकी दिली आहे. त्यांनंतर आता विक्रांत पाटील यांना आमदारकी दिल्याने भाजप रायगड जिल्ह्यात सक्षम पर्याय तर उभे करीत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विक्रांत पाटील यांनी मंगळवारी आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी म्हाडा कोकण विभागाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
भाजपचे कट्टर कार्यकर्ते असलेले बाळासाहेब पाटील यांचे विक्रांत हे पुत्र असून, भाजपच्या राज्यपातळीवरील महत्त्वाच्या पदांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.
पनवेलचे राजकारण बदलणार
१ विशेष म्हणजे, पनवेलमध्ये आमदारकी देऊ केल्याने भाजप रायगड जिल्ह्यात सक्षम पर्याय तर उभे करीत नाही ना? अशीही चर्चा विक्रांत पाटील यांना दिलेल्या आमदारकीवरून सुरु झाली आहे.
मराठा बांधवांना खूश करण्याचा प्रयत्न
२ पाटील यांची थेट आमदारकीपदी वर्णी लागली असल्याने भविष्यात पनवेलसह रायगडच्या राजकारणातही त्यांचे महत्त्व वाढणार आहे.
पनवेल महानगरपालिकेत मराठा समाजाला महापौर म्हणून नेतृत्व देण्याची मागणी केली होती. विक्रांत पाटील मराठा समाजाचे असल्याने राज्यभरातील मराठा बांधवानाही खूश करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
3 आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ते समर्थकांना जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे पनवेलमध्ये ठाकूर यांचे महत्त्व कमी करून शहरातील राजकारण बदलण्याची खेळी पक्षाने खेळली असल्याचीही चर्चा आहे.