महाराष्ट्र

टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टेंभू विस्तारीत प्रकल्पातील तीन घटक कामांचे भूमिपूजन

– टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देणार

 

सांगली, : टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्यास दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देऊ, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

टेंभू विस्तारीत प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुदळ मारून पार पडले. त्यानंतर विटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभु योजनापूर्तीसाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारीत प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील टप्पा क्र. 6, पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्र. 5 वितरण व्यवस्था व कामथ गुरूत्व नलिका यांचा समावेश आहे.

तत्पूर्वी खानापूर तासगाव कालवा, सुळेवाडी (विटा) (ता. खानापूर) येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, सुहास बाबर,अमोल बाबर आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे त्या क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येऊन  शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू विस्तारित प्रकल्पांतील विविध कामांची छायाचित्रातून माहिती घेतली.

भूमिपूजन झालेल्या कामांची माहिती

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या रु.7,370.03 कोटी रकमेच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय अहवालास महाराष्ट्र शासनाने दिनांक  5 जानेवारी रोजी मान्यता दिलेली आहे.

मूळ टेंभू योजनेतील सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगांव व कवठेमहांकाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या सात तालुक्यातील 240 गावांतील 80,472 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मितीचे काम पूर्णत्वास आले आहे. या करिता 22.00 अ.घ.फू. इतका पाणी वापर होणार आहे.

मूळ टेंभू प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालगत परंतु सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाऱ्या तसेच अंशत: सिंचनाचा लाभ मिळणाऱ्या गावांची टेंभू प्रकल्पाचा लाभ मिळणेसाठी अनेक वर्षापासूनची मागणी होती. टेंभू विस्तारीत योजनेकरिता सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगांव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या आठ तालुक्यातील 109 गावांतील 41,003 हे. सिंचन क्षेत्राकरिता वाढीव 8 अ.घ.फू.  पाणी उपलब्धतेस सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने अंतिम मान्यता दिलेली आहे.

टेंभू विस्तारीत योजनेतील कामांची एकूण किंमत रु.2,124.50 कोटी इतकी असून यामध्ये पाच घटक कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पंपगृह व मुख्य वितरिका, लघुवितरिका यांची कामे हाती घेण्यात येणार असून रु.1555 कोटी रक्कमेच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!