
भिलवडी : सांगली जिल्हा कडेगांव येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी माजी मंत्री, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व ताकारी-टेंभूचे शिल्पकार, आदरणीय स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमचे मार्गदर्शक, देशाचे नेते आदरणीय खा. राहुलजी गांधी यांच्या शुभहस्ते होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. खा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या या सोहळ्यास माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. रेवंत रेड्डी तसेच राज्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी तथा ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिली.
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, आदरणीय स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी मागील ५० वर्षांहून अधिक काळ शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा यासह विविध क्षेत्रांत मोलाचे कार्य केले. त्यांच्या या आदर्श विचारांचा वारसा आपणा सर्वांना अमूल्य बळ देणारा आहे. या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांच्या कार्याची चिरंतन ऊर्जा आपणा सर्वांना मिळावी यासाठी मी कटिबद्ध आहे व सदैव राहीन. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी नक्की यावे, असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.