दर्पण न्यूज विटा, प्रतिनिधी (शिराज शिकलगार ): क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सामान्य माणसाच्या विचारांचे संगोपन करून समाजाची बांधणी आणि राष्ट्राची उभारणी केली. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार त्यांनी आयुष्यभर केला. अंधश्रद्धा, अन्याय आणि शोषणाविरुद्ध जनजागृती करत त्यांनी गोरगरिबांना ज्ञानाचा प्रकाश दिला. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील हे खऱ्या अर्थाने लोकऊर्जेचे भांडार होते, असे प्रतिपादन सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी केले.
सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या वैशाली कोळेकर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
प्राचार्या वैशाली कोळेकर म्हणाल्या, “क्रांतिसिंह नाना पाटील यांनी समाजातील सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या कार्याची दिशा ठरवली. शेतकरी सुखी झाला पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. गोरगरीब जनतेचे जगणे उध्वस्त करणाऱ्या गावगुंडांना त्यांनी धडा शिकवला. अंधश्रद्धा आणि सामाजिक अनिष्ट रूढींविरोधात जनजागृती करून त्यांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिली.”
त्या पुढे म्हणाल्या की, नाना पाटील यांच्या सभा ऐकण्यासाठी हजारो लोकांचा समुदाय एकत्र येत असे. त्यांच्या विचारांमध्ये सामान्य माणसाला प्रेरणा देण्याची विलक्षण शक्ती होती. त्यांच्या शब्दांतून जनतेला लढण्याचे बळ आणि परिवर्तनाची ऊर्जा मिळत असे. म्हणूनच ते ‘लोकऊर्जेचे भांडार’ होते.
यावेळी योगेश्वर मेटकरी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या राष्ट्रनिष्ठेचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “समाजकल्याण आणि देशहित हा नाना पाटील यांच्या जीवनाचा मुख्य विचार होता. ते दोन वेळा खासदार झाले; मात्र त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नव्हते. संसारापेक्षा देशसेवेलाच त्यांनी सर्वस्व मानले. देश हेच त्यांचे कुटुंब आणि देशसेवा हेच त्यांचे जीवनध्येय होते. स्वतःच्या सुखाचा विचार न करता त्यांनी देशासाठी आयुष्य समर्पित केले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने महान देशभक्त होते.”
रघुराज मेटकरी यांनीही यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी नाना पाटील यांच्या संघर्षमय जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुष्मिता क्षीरसागर, आरोही डांगे, पायल साठे, मुद्रा पवार, तन्वी पवार, आरोही पवार आणि कांचन जगदाळे या विद्यार्थिनींनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नाना पाटील यांच्या सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती बाबर यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्यार्थ्यांमध्ये जागर निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रणव जानकर या विद्यार्थ्याने उपस्थितांचे आभार मानले.
