वाहतूक अपघात टाळण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांच्यात वाहतूक साक्षरता आवश्यक : पोलीस अधिक्षक संदीप घुगे

सांगली : रस्ता सुरक्षा अभियान हा उपक्रम फक्त अभियानापूर्ता न राहता संपूर्ण वर्षभर राबविणे गरजेचे आहे. वाहतूक अपघात कमी करण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांच्यात वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे, तरच भविष्यात नागरिकांच्यात “ट्रॅफिक सेन्स” निर्माण होईल, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी केले.
सांगली पोलीस मुख्यालय मैदानावर 35 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोखर, पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधिक्षक (गृह) डॅनियल बेन, पोलीस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक अधिकारी प्रशांत साळी, वाहतूक सुरक्षा दलाचे उप-महासमादेशक अनिल शेजाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात दि. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा सांगता समारंभ पोलीस मुख्यालय मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. पोलीस मैदानावर संचलनामध्ये 300 आर. एस. पी. बालसैनिकांनी सहभाग घेतला. बालसैनिकांनी अतिशय उत्कृष्टरित्या संचलन करून ट्राफिक सिग्नल पेटीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या उपक्रमाचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी कौतुक केले. रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आरएसपी च्या माध्यमातून चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा वाहतूक नियमन जनजागृती रॅली व विविध स्पर्धा घेतलेल्या 258 स्पर्धकांचा व आरएसपी अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित सर्व आरएसपी बालसैनिकांना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध वेपन्सचे डेमो ठेवून माहिती दिली. तसेच डॉगपथक, पोलीस मुख्यालयातील विविध विभाग, वाहतूक ट्राफिक गार्डन या सर्व विभागांना भेटी देवून माहिती दिली
यावेळी उप-महासमादेशक अनिल शेजाळे यांनी संपूर्ण वाहतूक सुरक्षा दलाचा सविस्तर आढावा दिला.
स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. आभार वाहतूक निरीक्षक असिफ मुलाणी यांनी मानले. कार्यक्रमास पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच 600 आरएसपी बालसैनिक उपस्थित होते.