दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी : जिल्हाधिकारी अशोक काकडे
- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न : आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ

दर्पण न्यूज मिरज /सांगली -: विविध बँकांमध्ये खातेदारांची 10 वर्षांपासून असलेली दावा न केलेली रक्कम त्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित खातेदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. बँकांनीही त्यांच्या शाखेमार्फत याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करून संबंधितांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्हा अग्रणी कार्यालय, बँक ऑफ इंडियाच्या वतीने जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून बँकेमधील रकमेचा दावा न केलेल्या खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आयोजित महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील स्व. वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित या महामेळाव्यात बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे उपअंचलिक प्रबंधक विशालकुमार सिंह, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ, एलआयसी सातारा विभागाच्या मॅनेंजर संगिता हिंगमिरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात ७,७५,३१५ खातेदारांची दावा न केलेली एकूण 176 कोटी रक्कम विविध बँकामध्ये तशीच पडून आहे. दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्याच्या मोहिमेमुळे संबंधितांना या रकमेचा चांगल्या कामी हातभार लागणार आहे. संबंधितांनी त्यांना मिळालेल्या रकमेची चांगल्या कामी गुंतवणूक करावी. या उपक्रमाची तालुकास्तरावर, गावागावामध्ये माहिती होण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. बँकांनी व्हॉटसॲप, एसएमएस व अन्य उपक्रमाव्दारे खातेदारांना याबाबतची माहिती द्यावी. आपल्या हक्काचा पैसा आपल्याला मिळावा यासाठी संबंधितांनीही आवश्यक कागदपत्रासह संबंधित बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उपस्थित विविध खातेदारांना दावा न केलेल्या रकमेचे प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश प्रदान करण्यात आले.
रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदाराने बचत, चालू व मुदत ठेव अशा स्वरूपातील 10 वर्षांत खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करावी लागते, अशी रक्कम मागणी करण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.
या मेळाव्यास विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, सर्व बँकांचे अधिकारी व 350-400 ग्राहकवर्ग उपस्थित होता. या उपक्रमात आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३८.९९ लाख रुपये प्रदान करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमांतर्गत नागरिकांना निष्क्रिय ठेवी, विमा, पेन्शन व इतर दावा न केलेल्या रकमेबाबत माहिती देण्यात आली आणि दावा प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
00000


