महाराष्ट्र

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्व प्रकारे मदत करणार :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मिनी सरस-2025 प्रदर्शनास' भेट

 

दर्पण न्यूज सांगली : असंख्य उच्चशिक्षित महिला लग्नानंतर आपली ओळख गृहिणी अशी करुन देतात. मात्र, हीच गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच आग्रही असून, आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित ‘मिनी सरस २०२५’ प्रदर्शन व विक्री केंद्रास आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. गेल्या वर्षभरात अनेक उद्योजकांना भेटून महिलांच्या कौशल्यानुसार त्यांना अर्धवेळ रोजगार उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरत होतो. टाटा उद्योग समूहाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे महिलांना आपलं घर चालवण्यात हातभार लावता येईल व त्या आत्मनिर्भर होण्याची सुरवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या संयोजनाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कौतुक केले.

पालकमंत्र्यांचे बचतगटांना प्रोत्साहन…

या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या विविध स्टॉलवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन विविध वस्तुंची प्रत्यक्ष खरेदी केली. त्याचबरोबर बचत गटांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे रोख रक्कम 75 हजार रूपये दिले. प्रदर्शनात एकूण 75 स्टॉलधारक आहेत. प्रत्येकी रू. एक हजार याप्रमाणे खरेदीसाठी वैयक्तिक रू. 75000/- रोख त्यांनी दिले. या रकमेतून विविध वस्तुंची खरेदी करून ते साहित्य विविध बालनिरीक्षण गृहामध्ये देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 जानेवारीपासून बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन मिनी सरस सुरू असून, दि. 27 रोजी त्याची सांगता होणार आहे. उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समुहांनी व समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे 54 स्टॉल व खाद्यपदार्थांचे 21 स्टॉल सहभागी झाले आहेत.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!