
पुण्यासारख्या महानगरातील नोकरी सोडून व्यवसाय उभारणे हे खरं तर धाडसच. पण, ते यशस्वीपणे पेलले आहे, वाळवा तालुक्यातील कामेरी येथील भाग्यश्री मनोज पाटील यांनी. चिकाटीच्या जोरावर संघर्षावर मात करणारी त्यांच्या स्वप्नपूर्तीची कथा प्रेरणादायी आहे.
भाग्यश्री मनोज पाटील या अभियांत्रिकी पदवीधर आहेत. कुटुंबात त्यांच्यासह सासू, सासरे, पती, दोन मुले इतके सदस्य आहेत. २०१० सालापर्यंत भाग्यश्री आणि मनोज पाटील हे दोघेही अभियंता क्षेत्रात पुणे येथे नोकरी करत होते. कौटुंबिक कारणास्तव त्यांना इस्लामपूर येथे मूळ गावी परतावे लागले. पण, दोघांचीही नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्याची जबरदस्त इच्छा होती.
प्रारंभी भाग्यश्री यांच्या साथीने पती मनोज पाटील यांनी भागिदारीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये जम बसल्यानंतर त्याचीच स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा मनोदय भाग्यश्री यांनी व्यक्त केला. त्याला मनोज पाटील यांनी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला अनुभव होता, पण भांडवलाची कमतरता हा मोठा अडथळा होता. अशा वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेने त्यांच्या स्वप्नांना संजीवनी दिली. त्यातून भाग्यश्री यांनी धनंजय एंटरप्रायझेज या नावाची फर्म सुरू केली. निक्स (knics) ब्रँडने त्या शूज आणि सॉक्सची निर्मिती त्या करतात.
याबाबत भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आमच्या धनंजय एंटरप्राइजेस या फर्ममधून सॉक्स अँड शूज तयार केले जातात. त्यासाठी मला आयडीबीआय बँकेकडून दहा लाख रुपयांचे टर्म लोन मिळाले. त्यातून पहिल्या चार मशिन्स उभारण्यात आल्या. त्यावर लेडीज, जेंट्स, चिल्ड्रन्स, स्कूल आणि स्पोर्ट्स सॉक्स तयार करण्यास सुरुवात झाली. “कस्टमायझेशन, ऑन-टाईम डिलिव्हरी आणि क्वालिटी” या त्रिसूत्रीच्या जोरावर आम्ही बाजारपेठेत स्थान मिळवले असल्याचे त्या म्हणाल्या.
केवळ चार वर्षांच्या अल्पावधीत त्यांच्या व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीला चार मशिन्सवर सुरू झालेला प्रवास आता बारा मशिन्सपर्यंत पोहोचला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत व्यवसायात गुंतवणूक केली. हा टप्पा शंभर मशिन्सपर्यंत नेण्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे.
भाग्यश्री पाटील यांनी केवळ सामान्य सॉक्स निर्मितीवर न थांबता हेल्थ-रिलेटेड उत्पादनांकडे वाटचाल सुरू केली. याबाबत त्या म्हणाल्या, आम्ही अद्ययावत स्तरावरील सॉक्स बनवण्यास सुरवात केली आहे. मधुमेहग्रस्त रूग्ण, तसेच व्हेरिगोज व्हेन्सपासून त्रस्त रुग्णांसाठी कॉम्प्रेशन स्टॉकिंग अशी नाविन्यपूर्ण मालिका बाजारात आणली. तसेच, खेळाडूंना उपयुक्त आर्म स्लीव्हज तयार केले जातात. बांबू मटेरिअलपासून बनलेले अद्ययावत स्तरावरील सॉक्स हेल्थ कॉन्सेस लोकांना अधिक उपयोगी पडत आहेत. या उत्पादनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ऋणनिर्देश व्यक्त करताना भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आमच्या यशामागे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा मोठा वाटा आहे. व्याज परताव्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेत भरणे सोपे झाले. त्यामुळे व्यवसायाला गती मिळाली आहे.
आज “धनंजय इंटरप्राईजेस”चा माल देशभरात विकला जातो, तसेच निर्यातही होत आहे. मनात इच्छा ठेवली, तर काहीही होऊ शकते. सर्व अडथळ्यांची शर्यत पार करता येते. इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांच्या उदाहरणातून हे सिद्ध होते. जिद्द, धाडस आणि शासकीय योजनांचा आधार असेल तर ग्रामीण भागातील महिलाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
प्रेरणा – मा. ना. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, सांगली जिल्हा
प्रोत्साहन – श्री. अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली
लेखन संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
समन्वय वर्षा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांगली
संकलन राऊ देशमुख, समुपदेशक