आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

सेवेचा दर्जा उत्तम ठेवा, लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा द्या : पालकमंत्री आबिटकर

राज्य कामगार विमा सोसायटीच्या आरोग्य सेवेचा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

 

दर्पण न्यूज कोल्हापूर : राज्य कामगार विमा सोसायटी कोल्हापूर परिक्षेत्रातील सेवा दवाखाने आणि इतर करार तत्वावरील दवाखान्यांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जावून सूचना दिल्या. कामगारांसाठीच्या सेवेचा दर्जा उत्तम राखावा, तसेच लाभार्थ्यांना योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.*

महाराष्ट्र राज्य विमा सोसायटीच्या कोल्हापूर ESIC च्या विभागाला आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली आणि आढावा घेतला. या वेळी त्यांनी औषध विभागाची पाहणी करत कॅन्सरसह दुर्मिळ आजारांसाठी आवश्यक औषधांचा साठा आणि खरेदी प्रक्रिया यांचा आढावा घेतला. बैठकीस डॉ. मिलिंद चौधरी (वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कोल्हापूर), डॉ. जयश्री जावडेकर, डॉ. सोमनाथ घोंगडे, डॉ. कौशिक, डॉ. जांभळे, डॉ. अनुष्का मंडावले आदी उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांत एकूण 18 सेवा दवाखाने कार्यरत आहेत. यामार्फत 1 लाख 93 हजार नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्यसेवा, तपासणी, शस्त्रक्रिया, उपचार आणि औषधे पुरवली जातात. ESIC अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या उपचारांवर मर्यादा नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “या योजनेचा अधिकाधिक कामगारांनी लाभ घ्यावा. ESIC मार्फत जिल्ह्यातील 15 डिस्पेंसरीच्या माध्यमातून 1 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या सुविधा उपचारांसाठी दिल्या जातात. राज्य शासनाच्या इतर योजनांमध्ये 5 लाख रुपयांचेच पॅकेज असते, परंतु ESIC अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचा लाभ कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना दिला जातो.

या योजनेंतर्गत 21 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या उद्योग कामगारांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवा दिल्या जात आहेत. इन-हाऊस डॉक्टरांच्या माध्यमातून तसेच रेफरल हॉस्पिटल्समार्फतही सेवा पुरविल्या जात आहेत. यापुढेही सहा जिल्ह्यांतील सर्व नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना उत्तम सेवा मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रचार-प्रसार करावा, यावर भर द्या. एकही तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने सेवा देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी दिल्या.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!