कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

दर्पण न्यूज मिरज/सांगली : ग्रामपंचायत कवठेपिरान येथील तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प हा सांगली जिल्हा परिषदेचा स्तुत्य पर्यावरणपूरक उपक्रम असून तो शाश्वत चालविण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
त्यांनी कवठेपिरान येथील तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच अनिता माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आणि किरण सायमोते, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संजय येवले, मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, माजी सरपंच भीमराव माने आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, कवठेपिरानच्या या प्लास्टिक व्यवस्थापन युनिटमुळे तालुक्यातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होऊन पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती व कार्यपद्धती विषद केली. यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, उपअभियंता, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बीआरसी प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



