उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे : प्रा.नारायण उंटवाले
जायंट्स ग्रुप व सार्वजनिक वाचनालयाकडून गुणवंत विद्यार्थी, आणि नूतन साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांचा सन्मान

भिलवडी :
आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणून शिकलं पाहिजे. शिक्षणाने क्रांती घडते. याच कारणामुळे बुद्धीवंत माणसेच श्रीमंत असल्याचे प्रतिपादन प्रा.नारायण उंटवाले यांनी केले.
जायंट्स ग्रुप व सार्वजनिक वाचनालय
आयोजित दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वाचनालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. उद्योजक गिरीश चितळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सपोनि भगवान पालवे, जायंट्स अध्यक्ष सुबोध वाळवेकर, स्मिता वाळवेकर प्रमुख उपस्थित होते.
उंटवाले म्हणाले,
गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरील व्यक्तींचा आदर्श घ्यावा. संस्कारी माणूस महत्त्वाचा आहे. शिक्षण आणि ज्ञानाने आपले मूल्य वाढणार आहे असे सांगून कोणतेही क्षेत्र निवडा त्यात तुम्ही टॉप असले पाहिजे असा सल्ला गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. भगवान पालवे यांनी वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे. सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करा. वाचनालयासाठी मी नेहमीच योगदान देणार असल्याचे सांगितले. गिरीश चितळे यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या पालकांचेही कौतुक केले.
सुबोध वाळवेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक केले. आभार महावीर चौगुले यांनी मानले. विद्यार्थी, पालक, वाचक, जायंट्सचे सर्व पदाधिकारी, वाचनालयाचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.