महाराष्ट्रराजकीय

सांगली लोकसभा: ईव्हीएम, कागदपत्र ठेवलेल्या दोन्हीही स्ट्राँगरुम सुरक्षित; कडेकोट बंदोबस्त तैनात : जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी

 

 

सांगली  : ४४-सांगली लोकसभा मतदार संघासाठी झालेली मतदानाची ईव्हीएम मशीन व  निवडणूक कागदपत्रे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे दोन प्रकारच्या स्वतंत्र स्ट्राँग रूम करून ठेवण्यात आल्या आहेत . ईव्हीएम व  कागदपत्र ठेवलेल्या दोन्हीही स्ट्राँगरुम सुरक्षित असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम व निवडणूक कागदपत्रे ठेवलेली स्ट्राँग रुम. या प्रत्येक स्ट्राँगरुमला दोन ठिकाणी फायर अलार्म यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. एक गोदामाच्या आतील बाजूस व दुसरी गोदामाच्या बाहेरील भिंतीवर स्थापित केलेली असून आज पहाटे चारच्या दरम्यान निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलार्म यंत्रणेमध्ये फॉल्स अलार्म (False alarm) झाल्याचे निर्दशनास आले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवेळी पावसामुळे फायर अलार्मची कंट्रोल पॅनल जो की पत्र्याच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेला होता, त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते. स्ट्राँग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता फायर अलार्म सिस्टीममध्ये फाल्स फायर अलार्म (False Fire Alarm) वाजल्याचे दिसून आले. सदर अलार्म हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून तो बंद करण्यात आला.

त्यामुळे स्ट्राँग रूम ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व उमेदवारांना संपर्क करण्यात आला त्यानुसार आज सकाळी उमेदवार श्रीमती सुवर्णा गायकवाड व  नानासो बंडगर व उमेदवार प्रतिनिधी सर्वश्री संदीप पाटील,  गजानन साळुंखे, आनंद रजपूत, दत्तात्रय पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, फायर ऑफीसर, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग यांनी संयुक्त भेट देऊन सकाळी पाहणी केली. त्यावेळी बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वा-याने बिघाड झाल्याचे दिसूनआले. त्या ठिकाणी आग सदृश्य कोणतीही परिस्थिती निर्दशनास आलेली नाही.निवडणूक कागदपत्र असलेल्या स्ट्राँगरूम दरम्यान असलेली फायर अलार्म यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आली. त्यावर उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान स्ट्राँग रूम उघडण्याची आवश्यकता नाही असे सर्वानुमते ठरविले.

अवेळी पावसापासूनच्या सुरक्षिततेच्या अतिरिक्त उपाय योजनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग,अग्निशमन विभाग यांना सूचना देण्यात आल्या . त्याचबरोबर CRPF, SRPF व सांगली जिल्हा पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त तैनात असल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी  स्पष्ट केले .

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!