मुंबई : उद्योग संचालनालय- महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघर आणि संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास (लीडकॉम) मुंबई पुरस्कृत जिल्ह्यातील चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी दि.२६ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२४ या कालावधीत अठरा दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत केला आहे. त्याबाबत सविस्तरपणे माहिती आणि निवड प्रकिया दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोज रविवार सकाळी ठीक १०.०० वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेचे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन, साई बाबा मंदिराजवळ, विरार ( पश्चिम ) ता. वसई जि. पालघर येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना जिल्हा प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी.पालघर यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील चांभार,ढोर,होलार,मोची युवक-युवती आणि महिलांकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम दि.२६ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२४ या कालावधीत एस. किनी रिसोर्ट सफाळे ता. जि. पालघर या ठिकाणी आयोजित केला आहे. या प्रशिक्षणात विविध उद्योगातील उद्योग संधी, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा,यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक सर्वंकष मार्गदर्शन,उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, बाजारपेठ व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल कसा तयार करावा यासह उद्योग उभाणीसाठीच्या विविध विषयांचा समावेश असेल.यामुळे पालघर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील युवक आणि युवतीना मोफत दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांच्या लाभ घेता येईल.
याची सविस्तपणे संपूर्ण माहिती सदरील विरार येथील मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमात देण्यात येणार असून त्याठिकाणी मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त चर्मकार बांधवांनी दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन, साई बाबा मंदिराजवळ, विरार ( पश्चिम ) ता. वसई येथील उद्योजकता परिचय कार्यक्रमात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी एम. सी.ई.डी.मुंबई यांच्याकडून करण्यात आले आहे.