कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते 26 जानेवारीला उद्घाटन

सांगली : राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २६ व २७ जानेवारी रोजी सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी दिली.
स्पर्धेच्या नियमावलीची माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयात तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत. जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, कृपामाई हॉस्पिटलसमोर, सांगली येथे या स्पर्धा होतील. राज्य / राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जाणार आहेत.
कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रक्कमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 75 हजार रूपये, व्दितीय पारितोषिक 50 हजार रूपये, तृतीय पारितोषिक 35 हजार रूपये व उत्तेजनार्थ पारितोषिक 20 हजार रूपये आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 51 हजार रूपये, व्दितीय पारितोषिक 35 हजार रूपये, तृतीय पारितोषिक 20 हजार रूपये व उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रूपये आहे. तसेच विविध 5 वजनी गटात सामने होणार असून विजेत्यांना 25 हजार ते 10 हजार रूपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेचा पारिलेषिक वितरण समारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असल्याचे श्री. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.