आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांचे निधन

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूर आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका नीना अरुण मेस्त्री-नाईक (वय ५७) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती उर्जा क्रिएशनचे संचालक अरुण नाईक, मुलगी तन्वी, सासू बहिण असा परिवार आहे. कोल्हापूर येथील कसबा बावडा स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. उद्या सकाळी साडेनऊ वाजता रक्षाविसर्जन आहे.
अलिकडे त्या आजारी होत्या उपचारादरम्यानही त्या आकाशवाणीपासून कधीच दूर गेल्या नाहीत. गेल्या चार जानेवारीला त्यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. गेली तीस वर्षे त्यांनी सांगली आणि सध्या कोल्हापूर निवेदिका म्हणून काम करताना त्या आकाशवाणीची ओळख झाल्या. सांगलीत विविध हौशी नाट्यसंस्थामधून त्यांनी कामे करीत अभिनयाची राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिके मिळवली होती. १९९० पासून हंगामी निवेदक म्हणून त्या सांगली आकाशवाणीत काम करीत याच काळात त्या ‘सकाळ’सह विविध दैनिकांमध्ये काम करीत होत्या. त्या काळात प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या त्या मोजक्या महिला बातमीदारांपैकी एक होत्या. १९९४ मध्ये त्या सांगली आकाशवाणीच्या सेवेत कायम झाल्या. तिथून त्यांनी विविध नभोनाट्यांसह प्रभातीचे रंग, आपली आवड अशा अनेक कार्यक्रमांमुळे त्यांची ओळख तयार झाली. ‘चितेवरच्या कळ्या’ या वसंत गायकवाड यांच्या कांदबरीच्या वाचनामुळे त्यांच्या आवाजाची सर्वदूर अशी ओळख तयार झाली. आकाशवाणीसाठी त्यांनी एका श्वासाचं अंतर, गावठाण, तीन दगडांची चुल, पालावरची माणसं अशा अनेक कांदबऱ्यांचं अभिवाचन त्यांनी केले. अगदी अलीकडे सदानंद कदम यांच्या ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकातील क्रमशः वाचनालाही श्रोत्यांची मोठी दाद मिळाली. स्पष्ट उच्चार आणि मधाळ वाणीतून त्यांनी आपली घराघरात ओळख निर्माण केली.