भारती शुगर्सच्या कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ
कारखाना कार्यस्थळावर स्व डॉ पतंगराव कदम यांना आदरांजली


दर्पण न्यूज पलूस- भिलवडी :-; नागेवाडी येथील भारती शुगर्स कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला असून, स्व.डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर करण्यात आली आहे.
सकाळी कारखाना कार्यस्थळावर भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांच्या हस्ते व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पगारवाढीच्या निर्णयानुसार ही वाढ १ नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक मा. महेंद्रआप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष ऋषिकेश महेंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांचे योगदान, वाढती महागाई व जीवनावश्यक खर्च लक्षात घेऊन कामगार व त्याच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचवावे याकरिता व्यवस्थापनाने हा सकारात्मक निर्णय घेतल्याचे महेंद्रआप्पा यांनी सांगितले.
या पगारवाढीचा लाभ भारती शुगर्समधील रोजंदारी कामगार , एकत्रित वेतन ,कायम , हंगामी अशा सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यासोबतच काही विभागांमध्ये नव्याने तयार झालेल्या कुशल कर्मचारी यांना हुद्देवाढ करण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी दिली.
पगारवाढीच्या घोषणेमुळे कारखान्याच्या परिसरात समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून कारखान्याच्या कार्यक्षमतेत व उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी एम एस पाटील, विकास सूर्यवंशी, एल जी पाटील, संजय मोहिते, दिलीप मिरजकर, अर्जुन मोकाशी, प्रसाद सुतार, प्रकाश पाटील, राजेंद्र गाडवे, जी डी निकम यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख कर्मचारी कामगार उपस्थित होते.
शुगर गोडाऊन किपर महादेव पवार यांनी आभार मानले.



