माहिती व तंत्रज्ञानमहाराष्ट्र

खलनायकाशिवाय चित्रपट अपुरा : रझा मुराद

गोवा/पणजी/अभिजीत रांजणे :-

 

भारतीय सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवणारे अभिनेते, रणजीत, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद आणि किरण कुमार यांनी आज इफ्फी 54 मधील संवाद सत्रात अनेक चित्रपटांचा प्रमुख भाग असलेल्या  खलनायकाच्या भूमिकेवर मनमोकळा संवाद साधला. कला अकादमी, पणजी येथे या प्रतिष्ठित महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘द व्हिलेन्स – लीव्हिंग अ लास्टिंग इम्प्रेशन’ या विषयावरील संवाद सत्राला, प्रेक्षागार तुडुंब भरले होते.

सिनेमामधील खलनायकाचे महत्त्व अधोरेखित करताना रझा मुराद म्हणाले, “खलनायक चित्रपटाचा स्वाद वाढवतात आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आम्ही जेव्हा चित्रपटात अशा भूमिका साकारतो, तेव्हा त्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असलेला, आणि त्यांच्या आवडीचा रंग भरतो. खलनायकाशिवाय चित्रपट अपुरा आहे.”

रझा मुराद

खलनायकाच्या भूमिकेसाठी आपल्या  तयारीबद्दल बोलताना गुलशन ग्रोव्हर म्हणाले, “जेव्हा मी चित्रपटात खलनायकाची भूमिका करतो तेव्हा माझ्या समजुतींना, माझ्या विचारांना महत्त्व नसते. पटकथेची मागणी असलेली व्यक्ती मी असतो.”

गुलशन ग्रोव्हर

आपल्या भूमिकेकडून प्रेक्षकांना असलेल्या अपेक्षांबाबत बोलताना किरण कुमार म्हणाले, “आम्ही मनोरंजन करणारे आहोत, अभिनेते नाही. चित्रपटगृहात समोरच्या रांगेपासून शेवटच्या रांगेत बसणाऱ्यांचे मनोरंजन करणे हे आमचे काम आहे. प्रेक्षकांना त्याच्या पैशाचा मोबदला देणे महत्वाचे  आहे.” ते पुढे म्हणाले की, नकारात्मक भूमिका करणाऱ्या खालानायाकाचे हेच काम असते, की चित्रपटाचा नायक सुपर हिरो म्हणून प्रेक्षकांच्या मनात ठसेल. खलनायकाच्या भूमिकेच्या महत्त्वावर भाष्य करताना ते म्हणाले, “नायकाला विरोध झाल्याशिवाय कोणताही चित्रपट अपूर्ण असतो.”

किरण कुमार

चित्रपटातील खलनायकाच्या असभ्य भाषेबद्दल आपले विचार मांडताना किरण कुमार म्हणाले, “आवश्यकता असेल, तर एखाद्याने अशी भाषा वापरायला टाळाटाळ करू नये.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की भाषा प्रेक्षकांना तो अभिनेता कोणत्या प्रदेशातील आहे, हे समजून घ्यायला मदत करू शकते, ज्यामुळे चित्रपटातील त्याची भूमिका अधिक प्रभावी ठरते.

रणजीत पुढे म्हणाले, “माझा विश्वास आहे की कोणीही असभ्य भाषा न वापरताही एखादा कलाकार स्वतःला खलनायक म्हणून प्रभावीपणे व्यक्त करू शकतो. मी हे केवळ माझ्या अभिनयानेच करू शकतो.” चित्रपटांमधील आपल्या भूमिकांबद्दल बोलताना ते म्हणाले, “होय, मी अत्यंत क्रूर खलनायकाच्या भूमिका साकारल्या, पण कधीच सभ्यतेची मर्यादा ओलांडली नाही.”

रणजीत

व्यक्तिरेखा साकारताना वेशभूषेचे असलेले महत्त्व सांगताना रझा मुराद म्हणाले, “एखादी भूमिका उभी करण्यासाठी वेशभूषा महत्वाची आहे. वेशभूषा भूमिका जिवंत करते. पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, वेशभूषा हे केवळ एक साधन असते. प्रतिभेची उणीव असेल, तर भूमिका प्रभावी ठरत नाही,” ते म्हणाले.

 

या विचारप्रवर्तक सत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार कोमल नहाटा यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!