केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्या : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : स्मार्ट पीएचसीमुळे रूग्णांना चांगले वैद्यकीय उपचार मिळतील. दर्जेदार बांधकाम असलेली अद्ययावत व सुसज्ज इमारत, अत्याधुनिक साधनसामग्रीमुळे स्थानिक नागरिकांची सोय झाली आहे. जनतेला आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या स्मार्ट पीएचसी या उपक्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हैसाळ येथे या उपक्रमाचे प्रातिनिधीक लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, म्हैसाळ पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूपाल शेळके, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. विवेक पाटील, सरपंच रश्मी शिंदे, उपसरपंच पद्मश्री पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, दीपक शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी हा उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ई-ओपीडी/टोकन सिस्टीम सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक साधनसामुग्री व अन्य चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या आरोग्य केंद्रातून दर्जेदार सेवा जनतेला मिळणार असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते फीत कापून म्हैसाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कोनशीला अनावारण करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यावेळी स्मार्ट पीएचसीची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली.
प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी स्मार्ट पीएचसी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच रश्मी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.