भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर व दिंडी संपन्न

दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व भारती विद्यापीठाचे न्यू लॉ, कॉलेज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान विषयी शिबिर व दिंडी आयोजित करण्यात आली. या दिंडीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग. कांबळे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या पूजा नरवाडकर प्राचार्या पूजा नरवाडकर, विधी विद्यार्थी आदि उपस्थित होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे म्हणाले, संविधानाचे रक्षण व जोपासना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांचे व कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. हा संदेश दिंडीच्या माध्यमातून देऊन दिंडीमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी झाले. त्यांच्यासमेवत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग. कांबळे होते.
प्रास्ताविकात प्राचार्या पूजा नरवाडकर यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक प्रक्रिया, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांबाबत मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाच्या मूल्यांची जनजागृती व्हावी, नागरिकांमध्ये संविधानाविषयी आदर, कर्तव्यभावना व लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने संविधान विषयी दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ही दिंडी भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली येथे या दिंडीची सांगता झाली. दिंडीचे नियोजन भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या पूजा नरवाडकर, प्राध्यापिका व विधी विद्यार्थी यांनी केले. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व, वाहतूक कायदा, पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, सायबर क्राईम, भ्रष्टाचार निमूर्लन, ज्येष्ठ नागरिक कायदे, महिलांचे कायदे व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा याविषयी जनजागृतीपर घोषणा देऊन याबाबतचे विविध फलक हातामध्ये घेवून जनजागृती केली.



