माळवाडी येथे स्व.डॉ.पतंगराव कदम यांची जयंती , आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माती परीक्षणाविषयी प्रबोधन

भिलवडी :
महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतनिमित्त व आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
त्यानिमित्त माळवाडी ता.पलूस येथे प्लॅस्टिक पेस्टीसाईड रासायनिक खते माती व पाणी परीक्षण काळाची गरज याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पोरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, माती आणि पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे. ती नैसर्गिक तयार होते. त्यामुळे मातीला जपा, तिला जगवा असे सांगितले. आजकाल रसायनांचा वापर भरपूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. कोणत्या मातीत कोणता घटक आहे हे बघण्यासाठी लाखो रुपयांची उपकरणे आहेत. पुढच्या कार्यक्रमात त्याचा प्रयोग निश्चित करू.
डॉ.टी.आर.लोहार यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली. २०-३० वर्षात याचे परिणाम दिसणार आहेत. ही धोक्याची घंटा आहे. प्लॅस्टिकमुळे जागतिक प्रदुषण होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक वापरणे हद्दपार करुन कापडी पिशव्या वापरा असे आवाहन केले.
डॉ. महेश कोल्हाळ यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम स्पष्ट केले. रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे शेतजमिनीचा पोत बिघडत चालला आहे. सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला दिला. आरोग्य वाचवण्यासाठी सेंद्रिय शेती उत्तम असल्याचे सांगितले.
सुशांत घोणे यांनी माती आणि परीक्षणबद्दल सांगितले.
स्वागत प्रा.रामचंद्र देशमुख तर आभार माजी उपसरपंच विशाल नलवडे यांनी मानले. यावेळी नेते संताजी जाधव, सरपंच सुरैय्या तांबोळी, डॉ.ए.एम.सरगर, सर्व सदस्य उपस्थित होते.