विकसित भारत संकल्प यात्रा आजपासून नागरी भागात
सांगली : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्या पर्यंत वेळेत पोहचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने, विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. या यात्रेचा दि. 2 जानेवारी 2024 रोजी पासून सांगली जिल्ह्यातील नागरी भागामध्ये प्रारंभ होत आहे. यात्रेदरम्यान केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी, आयुष्यमान भारत-PMJAY, आरोग्य, पीएम उज्वला योजना, आधार अद्ययावतीकरण करणे इत्यादींचे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील सर्व नागरिक, पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा, पीएम मुद्रा लोन, स्टार्ट अप, स्टैंड अप इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी), पीएम भारतीय जन औषधी परियोजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, खेलो इंडिया इत्यादी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्न मंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या यात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे. 2 जानेवारी – सकाळ सत्रात कवठेमहांकाळ नगरपंचायत, दुपार सत्रात जत नगरपरिषद. 3 जानेवारी – सकाळ सत्रात आटपाडी नगरपंचायत, दुपार सत्रात खानापूर नगरपरिषद. 4 जानेवारी – सकाळ व दुपार सत्रात विटा नगरपरिषद. 5 जानेवारी – सकाळ सत्रात कडेगाव नगरपंचायत, दुपार सत्रात पलूस नगरपरिषद. 6 जानेवारी – सकाळ व दुपार सत्रात तासगाव नगरपरिषद. 7 जानेवारी – सकाळ व दुपार सत्रात आष्टा नगरपरिषद. 8 जानेवारी – सकाळ व दुपार सत्रात इस्लामपूर नगरपरिषद. 9 जानेवारी – सकाळ सत्रात इस्लामपूर नगरपरिषद, दुपार सत्रात शिराळा नगरपंचायत.