दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) सांगली यांच्यावतीने पंचायत समिती जत येथे ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने 8 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान दुग्ध व शेळीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जत तालुक्यातील शेतकरी व बेरोजगार युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम. सी. ई. डी. विभागीय अधिकारी सुदाम थोटे व प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सुशिक्षित बेरोजगार शेतकरी कुटुंबातील व्यक्ती यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन कशा पद्धतीने करावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये दुधाळ व्यवसायाचे आर्थिक तंत्र, जनावराच्या जाती, शेळीच्या विविध जाती व योग्य जातीची निवड तसेच कुक्कुटपालन मध्ये पक्षाच्या विविध जाती, योग्य जातीची निवड, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन, गोठा बांधणी, आझोला चारा, हायड्रोपोनिक चारा व हिरव्या चाऱ्याच्या विविध जाती, शेळी पालनमध्ये शेळीपालनाचे व्यवस्थापन, करडाची निगा, गोठा बांधणी, जनावरांचे आजार, उपचार, लसीकरण, चाऱ्याचे नियोजन तसेच व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन, पशुखाद्य निर्मिती, गांडूळ खत निर्मिती तसेच शासनाच्या विविध कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती , प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम आयोजक सकीना ममदापूरे मो. नं. 9172735567 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.