आटपाडी येथे उत्तम शेती पद्धतीविषयी डाळिंब उत्पादकांसाठी प्रशिक्षण उत्साहात

सांगली : आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादकांसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उत्तम शेती पद्धती याविषयी प्रशिक्षण संपन्न झाले.
आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात २६ जुलै रोजी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, कृषी विभागाचे अधिकारी, डाळिंब तज्ज्ञ डॉ. विनय सुपे, डॉ. प्रशांत कुंभार, माणदेश शेतकरी उत्पादक कंपनीचे गुलाबराव पाटील, ॲड. धनंजय पाटील, विश्वास जाधव, संपत यादव,अनिल जाधव आदि उपस्थित होते.
डाळिंब उत्पादकांनी उत्तम शेती पद्धतीचा अवलंब करून तेल्यासारख्या रोगाचा प्रतिकार करावा, असे आवाहन सभापती संतोष पुजारी यांनी यावेळी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. विनय सुपे यांनी डाळिंब उत्पादसाठी उत्तम पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत तर मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. डॉ. प्रशांत कुंभार यांनी सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाचे उत्पादन घेऊन त्याचे मार्केटिंग कसे करावे याबाबत आणि जैन इरिगेशनचे श्री. मगदूम यांनी डाळिंब पिकातील पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमास आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयश पाटील यांनी केले व सुयोग टकले यांनी आभार मानले.