पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे युवा दिनी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

दर्पण न्यूज पलूस :-
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ तसेच राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून पॅराऑलिंपिक मध्ये 50मी खुल्या जलतरण स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे इस्लामपुरचे सुपुत्र पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे आपल्या प्रेरक भाषणाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यालय प्रांगणात पाहुण्यांचे पदार्पण झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल कांबळे सर वरिष्ठ शिक्षक श्री. महेश निकम श्री. नितीन लोणकर सौ.भारती माळी व अन्य शिक्षक वृंदासह विद्यालयाचे एन.सी.सी. कॅडेट्स तसेच स्काउट गाइड उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोचल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल श्री अर्जुन पेटकर यांनी आपल्या वडिलांचा यशस्वी आणि तितकाच संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तत्पश्चात प्रश्नोत्तराचे सत्र सुरू झाले ज्यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना श्री.मुरलीकांत पेटकर सरांनी दिलखुलास व अत्यंत प्रेरणादायक उत्तरे दिली. या अंतर्गत त्यांनी लहानपणीच्या खाशाबा जाधव यांच्या मिरवणुकीत आपणही चॅम्पियन होण्याचा जो दृढनिश्चय केला होता तेव्हापासून ते पुढील संघर्षमय जीवनाच्या अनेक आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. एका विद्यार्थिनीने विचारलेल्या पॅराऑलिपिक स्पर्धेत भाग घेताना तणाव आला होता का? या प्रश्नाचे अत्यंत मार्मिक उत्तर त्यांचे सुपुत्र श्री.अर्जुन पेटकर यांनी आपल्या वडिलांच्या वतीने दिले. ते म्हणाले की त्या काळात तणाव हा शब्दच अस्तित्वात नव्हता. कठोर परिश्रम करणे आणि ध्यासाचा मागोवा घेणे केवळ याचेच पालन केले जाई. तेच बाबांनीही केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंदू चॅम्पियन या चित्रपट निर्मितीसंबंधीची अत्यंत रोचक माहितीही त्यांनी दिली. या सुसंवादानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल कांबळे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सेवानिवृत्ती हा शब्द श्री.मुरलीकांत पेटकर सर ना लागू होत नाही. भारत सरकारने त्यांना युथ आयकाॅन हा बहुमान दिला आहे. तेव्हा ते आजही तरुणाईचे प्रेरणास्थान आहेत व युवा दिनाचे खरे मानकरी आहेत.तसेच पद्मश्री मुरलीकांत पेटकरांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री.महेश निकम यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे संयोजन संगीत शिक्षक श्री.योगेंद्र देवरस तर सूत्रसंचालन सुश्री शबाना मुल्ला यांनी केले.