योजनांची माहिती व लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम :

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती व वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय समोर ठेवून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती जनतेला व्हावी व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत सुलभरित्या पोहोचावा याकरीता दिनांक 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सहायक आयुक्त, समाजकल्याण सांगली, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सांगली व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रम व उपक्रमामध्ये मांग, मातंग, मांग- गारुडी, मेहतर व इतर मागासप्रवर्गाच्या नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रचार – प्रसिध्दी, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या तसेच मातंग समाजाच्या घटकांना भेटी देणे, विशेष मोहिम राबवून जातवैधता प्रमाणपत्राचे वाटप करणे, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतीगृहांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यांचे आयोजन, स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर, कर्मवीर दादासाहेब सबळीकरण योजना, या वैयक्तीय योजनांचे प्रातिनिधीक स्वरुपात साहित्य वाटप, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी कार्यशाळा, आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतीगृह, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथीय, ऊसतोड कामगार यांच्याकरीता आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे, नवउद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबिर, नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती कार्यक्रम, तृतीयपंथीय व्यक्तींसाठी जनजागृती व ओळखपत्रे वाटप, अंधश्रध्दा निर्मूलन जनजागृती, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रम आयोजित करणे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांना सामाजिक सुरक्षितता उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे आदी उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.