दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- दि. १२ ऑगस्ट २०२६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलाकौशल्य, नवनिर्मितीची दृष्टी आणि व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे, तसेच शालेय शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील व्यवसाय व कारागिरीची माहिती मिळावी, या उद्देशाने भारतमाता ज्ञानपीठ संचलित सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विटा येथील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आकाश कला केंद्रास शैक्षणिक भेट दिली.
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने शहर परिसरात गणेशमूर्तींच्या निर्मिती व रंगरंगोटीच्या कामाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता यावी आणि या कलेमागील मेहनत, कौशल्य व व्यावसायिक दृष्टिकोन समजावा, यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले.
आकाश कला केंद्राचे मालक जसवंत वर्मा तसेच त्यांचे सहकारी पंकज कुमार व रिंकू कुमार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणेशमूर्ती निर्मितीची सविस्तर माहिती दिली. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मूर्तीचा सांगाडा तयार करणे, मातीचा वापर, विविध आकार व भावभावना देणे, बारीक कलाकुसर करणे, मूर्ती वाळवणे, रंगकाम तसेच अंतिम सजावट या संपूर्ण प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना केवळ मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले नाही, तर त्यांना प्रत्यक्ष मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि कुतूहल दिसून येत होते. कलावंतांच्या हातातील कौशल्य, संयम, कल्पकता आणि मेहनत पाहून विद्यार्थ्यांना या पारंपरिक कलेचे महत्त्व जाणून घेता आले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कला ही केवळ छंद नसून त्यातून रोजगार व व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते, याचीही जाणीव झाली. शालेय शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण आणि स्थानिक व्यवसायांची ओळख विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाची आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
या शैक्षणिक भेटीसाठी आसिफ मुजावर, वैष्णवी जाधव व राजू गारोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आकाश कला केंद्रातील कारागिरांशी संवाद साधून गणेशमूर्ती निर्मितीबाबत विविध प्रश्न विचारले आणि उत्स्फूर्तपणे माहिती जाणून घेतली.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी, अध्यक्षा रेखा शेंडगे, प्राचार्या वैशाली कोळेकर आणि कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्रशालेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना अशा प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रमांमधून शिकण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यावसायिक कौशल्यांना वाव देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी करेल.
