दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :—दि. ६ ऑगस्ट : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात), धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी उपसा सिंचन विभाग, धाराशिव येथील उपविभागीय अभियंता संजय थोरात यांच्या सन २०२३ पासून आजपर्यंतच्या संपूर्ण शासकीय कामकाजाची स्वतंत्र राज्यस्तरीय उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात सन २०२३ पासून आजपर्यंत करण्यात आलेल्या सर्व विकासकामांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यादेश, मोजमाप पुस्तके, क्षेत्रभेटी, हालचाल रजिस्टर, दौरा आदेश, कार्यालयीन नोंदी, वाहन लॉगबुक, जीपीएस नोंदी, जीओ-टॅग छायाचित्रे, निधी खर्च, देयके, पूर्णत्व प्रमाणपत्रे तसेच इतर आर्थिक व प्रशासकीय बाबींची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच सर्व विकासकामांचे स्वतंत्र तृतीय पक्षामार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करून शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी. चौकशीत आर्थिक, प्रशासकीय अथवा तांत्रिक अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, महाराष्ट्र वित्तीय नियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर विभागीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान कोणताही पुरावा नष्ट होऊ नये किंवा त्यामध्ये फेरफार होऊ नये म्हणून ई-ऑफिस नोंदी, मोजमाप पुस्तके, वाहन लॉगबुक, सीसीटीव्ही फुटेज, संगणकीय माहिती, जीओ-टॅग माहिती तसेच इतर संबंधित अभिलेख तात्काळ जप्त करून सुरक्षित ठेवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रकरणात शासनाने १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करून लेखी अहवाल सादर करावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात), धाराशिव जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन, बेमुदत अन्नत्याग आंदोलन तसेच कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
