
दर्पण न्यूज पलूस, दि. ६ : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पलूस शहरात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यालयापासून शिवतीर्थापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात शेकडो महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेत काँग्रेसविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याने काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चाला प्रारंभ होताच “महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो”, “सुनेत्रा पवारांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो”, “काँग्रेसने माफी मागावी”, अशा घोषणांनी पलूस शहर दणाणून गेले. विशेष म्हणजे या मोर्चात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. त्यामुळे हा निषेध मोर्चा महिलांच्या स्वाभिमानाच्या प्रश्नावर उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मोर्चा शिवतीर्थ येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली.
यावेळी बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, “शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. जनतेसमोर काँग्रेसला जाब विचारण्यात येईल. हा जिजाऊंचा, अहिल्यादेवींचा, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे याचे भान काँग्रेसच्या नेत्यांनी ठेवावे. संविधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करणारे सामान्य महिलांच्या बाबतीत कसे वागत असतील असा प्रश्न पडतो. त्यांनी आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो याची जाणीव ठेवून माफी मागावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. महिलांचा सन्मान राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार आहे,” असा इशारा प्रदीपआप्पा कदम यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अमीर पठाण, अभिजीत सावंत,राहुल पाटील,संजय शिंदे यांनीही काँग्रेसवर टीका करत महिलांच्या सन्मानाशी तडजोड करणारे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नसल्याचे सांगितले.
महिला पदाधिकारी रुकसाना मुलाणी व रेणुका मिरेकर लता नवले यांनी परखड भूमिका मांडत महिलांचा सन्मान अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षाने पाळली पाहिजे, अन्यथा नारीशक्ती काय आहे हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. स्त्रियांचा स्वाभिमान दुखवाल तर कायमचे घरी बसाल, असा इशारा देत संबंधितांनी माफी मागितले पाहिजे, अशी मागणी केली.
मोर्चात तोफिक मुल्ला,आशिष सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी,शुभम निकम, प्रताप पाटील, बाळकृष्ण पवार, रणजित शिंदे,सागर कदम, विकास कदम, उल्हास पाटील, उमर मुल्ला, नितीन सुर्वे, भास्कर संकपाळ, राहुल पाटील (बांबवडे), महेश हजारे, शाबाज नदाफ, अभिजीत कौलगे यांच्यासह रूकसाना मुलाणी, आशाताई गायकवाड, सरिता कुंभार, रेणुका मिरेकर, शोभा वडुलकर, वंदना कांबळे, कविता शिखरे आणि शेकडो महिला-पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.
