सुगंधी सुपारी, तंबाखू, मावाविक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर कठोर कार्यवाही करा ; जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज मिरज / सांगली : जिल्ह्यात सुगंधी सुपारी, तंबाखू व मावा विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करा. तसेच तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, कृषि विभाग, विक्री कर विभाग, कामगार कल्याण विभाग, दंत महाविद्यालय यांचे अधिकारी तसेच जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



