दर्पण न्यूज धाराशिव (संतोष खुने) – : आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने दि. २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रकल्प अंमलबजावणी विभाग, धाराशिव यांच्याकडे येडशी, तामलवाडी व नळदुर्ग टोलनाक्यांवर टोलमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या महामोर्चात धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुके, गावे व ग्रामीण भागासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो भीमसैनिक, संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी बस, जीप, चारचाकी, ट्रॅव्हल्स, दुचाकी व इतर वाहनांद्वारे सहभागी होणार आहेत. महामोर्चा संपल्यानंतर सर्व सहभागी पुन्हा आपल्या-आपल्या गावांकडे परत जाणार असल्याने त्यांना आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने दि. २८ जुलै २०२६ रोजी येडशी, तामलवाडी व नळदुर्ग टोलनाक्यांवर येणाऱ्या व परत जाणाऱ्या सर्व वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात संबंधित टोलनाका व्यवस्थापनास आवश्यक सूचना देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान राखून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
हे निवेदन मा. प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रकल्प अंमलबजावणी विभाग, धाराशिव यांना सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती माहितीस्तव व पुढील कार्यवाहीसाठी मा. जिल्हाधिकारी, धाराशिव, मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव, मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), धाराशिव तसेच संबंधित पोलीस ठाणे व टोलनाका व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनकर्ते :
राजाभाऊ राऊत, विकास बनसोडे, भालचंद्र कटारे, बाळासाहेब माने, आनंद भालेराव, भाई फुलचंद गायकवाड (पाटील) व सुनील वाघमारे.
