दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार)—: दिल्ली येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ संबोधले आहे. हे विधान अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय आणि सत्तेच्या अहंकाराचे प्रतीक आहे.सत्तेच्या हव्यासापोटी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून अशा मानसिक रुग्णाचा समाजाला धोका असण्याची दाट शक्यता आहे. नीट (NEET) परीक्षा आणि पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. आपल्या हक्कासाठी शांततेने आवाज उठवणाऱ्या तरुणांना ‘दहशतवादी’ म्हणणे हा देशातील तरुण पिढीचा आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा घोर अपमान आहे, असे मनसेचे तालुका अध्यक्ष साजिद आगा यांनी पत्रकात नमूद केले आहे.
आगा म्हणाले की, सदाभाऊ खोत हे स्वतः शेतकरी चळवळीतून आणि आंदोलनातून पुढे आलेले नेते आहेत. सत्तेत गेल्यानंतर ते स्वतःचा इतिहास विसरले असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.
भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे.एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात गुलाब घेऊन लढणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरवणे ही अत्यंत विकृत मानसिकता आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या या बेजबाबदार आणि अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्याबद्दल देशातील आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची बिनशर्त जाहीर माफी मागावी.जर त्यांनी तातडीने माफी मागितली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचे नाव मनोरुग्णालयात नोंदणी करेल याची नोंद घ्यावी. दाखल करायची जबाबदारी प्रशासनाची राहिल.
