दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार , दि. ३० जुलै रोजी विटा येथील जय मातादी मंगल कार्यालय, सांगली रोड मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी आ. सुहास बाबर असणार आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून खानापूर (विटा) व आटपाडी तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिरास आटपाडी व खानापूर तालुक्यातील प. स. सभापती, सर्व जि. प. व प. स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व गावचे सरपंच, चेअरमन सदस्य निमंत्रित करण्यात येणार असून त्यांनी आपल्या गटातील व गणातील नागरिकांना शिबिराबाबत सूचित करण्याचे आवाहन केले आहे.
महाराजस्व शिबिरात विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, अर्ज स्वीकारणे, लाभार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शक्य तितक्या अर्जांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
या शिबिरात महसूल, कृषी, ग्रामविकास, पंचायत राज, समाजकल्याण, महिला व बालविकास, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, शिक्षण, रोजगार आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक सेवा व मार्गदर्शन देणार आहेत.
शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, ‘जिवंत सातबारा’ मोहीम, घरकुल योजनांचा लाभ, वाटणी पत्र नोंदणी शुल्क माफी , आधार कार्ड नोंदणी, PM किसान सह विविध महसुली सेवा आणि शासनाच् विविध विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे.
तसेच खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या महाराजस्व शिबिराचा लाभ घ्यावा आणि उपक्रम यशस्वी करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने या महाराजस्व शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.
