दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) —: नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर दि. २० जुलै २०२६ रोजी विद्यार्थी, महिला व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला धाराशिव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शांततापूर्ण पद्धतीने बंदमध्ये सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, धाराशिव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापारी बांधवांना शांततामय वातावरणात दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बंद आंदोलनाला आर.पी.आय. (खरात गट), रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. बंदच्या पार्श्वभूमीवर आर.पी.आय. (खरात गट)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विकास बनसोडे आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव भाई फुलचंद गायकवाड (पाटील) यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये आंदोलन संविधानिक, लोकशाही व पूर्णतः शांततापूर्ण मार्गाने पार पडणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली होती.
महाराष्ट्र बंदला धाराशिव जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, वाहनचालक, शेतकरी, कामगार, विविध सामाजिक संघटना तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, व्यापारी व संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
