



दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):-विटा हायस्कूल, विटा येथे विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम शनिवार दि. 18 जुलै रोजी घेण्यात आला. विद्यार्थ्यांची गरज व सामाजिक परिस्थिती ओळखून विद्यार्थ्यांच्यात परस्परांविषयी सहकार्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने राबविण्यात येणार हा उपक्रम विटा हायस्कूलचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाचे माजी अध्यक्ष मा. माधवदादा मोहिते होते. तसेच प्रमुख पाहुणे विटा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. अजित माळी सर, विट्यातील प्रतिष्ठित नागरिक मा. श्री. प्रदीपकुमार बाबर सर व मा. श्री. शरद बसागरे सर होते. विद्यालयातील स्कूल कमिटी सदस्य मा. श्री. सुभाषबापू पाटील व मा. श्री. यु. एन. पवार सर व विट्यातील ज्येष्ठ पत्रकार सिरजभाई शिकलगार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे तसेच समाजभूषण बाळकृष्ण रावजी मोहिते यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी केले. त्यामध्ये त्यांनी विद्यालयांमध्ये चालवल्या जाणाऱ्या गरीब कल्याण निधी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. व उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. यानंतर गरीब कल्याण निधी विभाग प्रमुख श्री. बी. एम. भंडारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयातील सुमारे 150 विद्यार्थ्यांना यावेळी गणवेश वाटप करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. अजित माळी सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील अतिशय प्रेरणादायी अनुभव सांगितले. अत्यंत खडतर परिस्थिती वर जिद्दीने मात करून यशाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या कथेने सर्व विद्यार्थी भारावून गेले. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. माधव दादा यांनीही विद्यार्थ्यांना अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले.
शेवटी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. काळे सर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
