
दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी (मुख्य संपादक अभिजीत रांजणे) : – दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत पलूस तालुक्यात विविध ठिकाणी जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहात पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, कृषी, युवक मार्गदर्शन आणि रक्तदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांनी केले आहे.
जनसेवा सप्ताहाची सुरुवात बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जि.प. शाळा, मोराळे येथे वृक्षारोपणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता बांबवडे येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, रामानंदनगर येथे अल्पसंख्यांक सेवा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता रामानंदनगर येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. दुपारी १२ वाजता विठ्ठल मंदिर, बुर्ली येथे महिला सक्षमीकरण उपक्रम, महिला मेळावा तसेच अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्काराचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिला सबलीकरण, सूक्ष्मकर्ज, कौशल्य विकास, प्रशिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता देवराष्ट्रे येथे स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्मृतीस्थळ अंकलखोप येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे
शनिवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदिर, आमणापूर, अंकलखोप आणि बोरजाईनगर येथे एकाच वेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, एचपी पंपासमोर, पलूस येथे कृषी विषयक शेतकरी मेळावा तसेच अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
सोमवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता पलूस शिक्षण प्रसारक मंडळ सांस्कृतिक हॉल, स्टेडियमजवळ, पलूस येथे युवा संकल्प शिबिर, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व व कौशल्य मार्गदर्शन मेळावा तसेच स्व. अजितदादा यांच्या सामाजिक विचारधारेवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, गुंडादाजी कॉम्प्लेक्स, पलूस येथे भव्य रक्तदान शिबिर होणार असून जनसेवा सप्ताहाची सांगता या उपक्रमाने होणार आहे.
या जनसेवा सप्ताहामध्ये पर्यावरण संरक्षण, आरोग्य सेवा, महिला व युवक सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमांना यशस्वी करावे, असे आवाहन प्रदीप(आप्पा) कदम यांनी केले आहे.
