
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार)फलटण :-
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) सांगली जिल्हा टीमने सामाजिक बांधिलकी जपत सलग पाचव्या वर्षी आषाढी वारीमध्ये विविध सेवाभावी उपक्रम राबवून वारकऱ्यांची मनापासून सेवा केली. या उपक्रमाचे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.
वारीमध्ये सहभागी होणाऱ्या माऊलींसाठी संस्थेच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा, औषधांचे वाटप, ब्लँकेट वाटप, मोठ्या प्रमाणात अन्नदान, तसेच पायांना मलम लावणे, मसाज करून देणे आणि गरजूंना आरोग्यविषयक मदत देण्याचे कार्य करण्यात आले. वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा करत त्यांच्या आशीर्वादाचे पुण्य पदरात पाडून घेण्याचा हा प्रयत्न संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ही संस्था केवळ वारीपुरती मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असते. कोविड-19 महामारीच्या काळात संस्थेने अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला. तसेच महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरे आयोजित करून अनेक रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. याशिवाय गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सामाजिक मदत आणि जनकल्याणाचे विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
दि. 17 जुलै 2026 रोजी फलटण येथे आयोजित अन्नदान, ब्लँकेट वाटप आणि मेडिकल सेवा उपक्रमामध्ये सांगली जिल्ह्याच्या ॲडमिन टीमने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सेवाकार्यात देवमोरे सर, रवी सर, अमोल सर, वसंत सर, किरण सर, सुहास सर, शुभम सर आणि महेंद्र जगताप यांच्यासह सर्व ॲडमिन व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.
सांगली जिल्हा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची ही सेवाभावी परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा निःस्वार्थ कार्यामुळे संस्थेचा सामाजिक सन्मान आणि विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. समाजहितासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, ॲडमिन टीम आणि सदस्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
