भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा, थोर समाजसेविका डॉ. चंद्राताई नारायण शेणोलीकर यांचा ३१ वा. स्मृतिदिन दि. १६ जुलै रोजी भिलवडी शिक्षण संस्था संकुलात संपन्न होत आहे. डॉ. शेणोलीकर यांचे आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आजच्या पिढीला ज्ञात होऊन, प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने डॉ. शेणोलीकर यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील शेणोली ही जन्मभूमी तर भिलवडी परिसर कर्मभूमी ठरली.देशभरातील वैद्यकीय शिक्षण संस्थेत डॉ.शैणोलीकर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.मुंबई येथील डॉ. म्हसकर यांचे माता बाल संगोपन केंद्र भिलवडी येथे आहे. प्रवासात डॉ. म्हसकर व डॉ. शेणोलीकर यांची ओळख झाली. भिलवडी आरोग्य केंद्र त्यावेळी राधाबाई जोशी माई चालवत होत्या. डॉ. म्हसकर अत्यंत प्रतिभावंत, वैद्यकीय क्षेत्रातील जाणते नेतृत्व होते. साहजिकच भिलवडी आरोग्य केंद्राचे काम डॉ. शेणोलीकर यांनी पहावे, असे मत डॉ. म्हसकर यांनी मांडले.महाराष्ट्र सोडून जुनागड, वेरावळ येथे जाऊन रुग्णांची सेवा डॉ. शेणोलीकर यांनी केली होती. वैद्यकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव व आत्मविश्वास मिळाला होता. भिलवडी येथील माता बाल केंद्रामधून ७७७६ इतकी बाळंतपणे, ६८८५ बाळंतिणी, १३५०९ बालके, १११६९ अर्भके व ९०५९ गर्भवती स्त्रीयांची सेवा डॉक्टरांनी केली. डॉ. शेणोलीकर यांचे आपले असे कधीच काही नव्हते, परंतु त्या इतरांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या होत्या.माता बाल संगोपन केंद्र व भिलवडी शिक्षण संस्था ही दोन डॉक्टरांच्या जीवनाची मूलभूत अंगे होती. डॉक्टर अविवाहित होत्या, त्यांनी स्वतःचा संसार कधी उभारला नाही. माता बाल केंद्राच्या रुपाने गरीब, विधवा, स्त्रीयांच्या डॉक्टर माता-पित्या होत्या.कॄष्णाकाठी वसलेले भिलवडी गांव शिक्षणात अग्रेसर होते.घरटी एक शिक्षक होते.गावात प्राथमिक शिक्षणाची सोय होती, परंतु माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. गांवातील चाळीस प्राथमिक शिक्षक एकत्र आले, त्यांनी इंग्लिश शाळा सुरू करणेचे ठरविले. या उपक्रमात डॉ. शेणोलीकर सहभागी झाल्या. दि. १६/६/१९४९ रोजी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड झाली.संचालक मंडळात सभासद म्हणून काम करणेची संधी डॉ. शेणोलीकर यांना मिळाली.कॄष्णा घाटावरील ओवरी, श्री क्षेत्र निविदी, स्व. तात्यासाहेब चोपडे यांच्या वाडयात शाळा भरु लागली.विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत होती,तासगांव भिलवडी रस्ता जवळ असणारे गायरान,भिलवडी ग्रामस्थांच्या नांवे असणारी जमीन,भिलवडी शिक्षण संस्थेस शाळा उभी करणेसाठी दिली.या सर्व शैक्षणिक घडामोडीत डॉ. शेणोलीकर यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर तात्कालीन संस्था कार्यकारी,देणगीदार,शेतकरी बांधव, ग्रामस्थ,शिक्षक,मे.बी.जी.चितळे उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे.डॉ.शेणोलीकर यांनी रु. १५०० ची पहिली देणगी दिली. त्यापासून शाळेला गरजेचे साहित्य घेतले. शाळेला मान्यता मिळाली.इमारती उभ्या केल्या.डॉक्टरांनी स्वहस्ते इमारतीच्या भोवताली झाडे लावली.डाॅ.शेणोलीकर व ग्रामस्थानी पन्नास पैसे पासून भिलवडी परिसरात संस्था व शाळेसाठी देणगी गोळा केली. डॉ.शेणोलीकर यांनी आरोग्य केंद्रातील मिळणारे वेतन, भिलवडी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी दिले.दीनदलित, सर्वसामान्य नागरिक यांचे कडून ५१ हजार रुपयांची थैली डॉ.शेणोलीकर यांच्या सत्कार समारंभ सोहळ्यात दिली होती.लोकवर्गणीतून मिळालेली रक्कम त्यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला दिली. सन १९६१ ते १९८६ या काळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.तब्बल २५ वर्षे भिलवडी शिक्षण संस्था अध्यक्षा म्हणून त्यांनी शैक्षणिक कार्य केले.निर्भीड,रोखठोक,प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड लोकसंग्रह लाभलेले व्यक्तीमत्व म्हणून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात त्यांची ओळख होती.भिलवडी शिक्षण संकुल,माता बाल केंद्रामध्ये डॉ.शेणोलीकर यांच्या विषयी कमालीचा भीतीयुक्त आदर होता. हे नाकारता येत नाही.दि. १६ जुलै १९९५ रोजी डॉ. शेणोलीकर यांचे दु: खद निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त भिलवडी शिक्षण संस्थेचा हिताचा विचार केला. मा.नानासाहेब चितळे यांना तासगाव येथे बोलावून,बॅंकेत ठेवलेली रक्कम भिलवडी शिक्षण संस्थेच्या नांवे करणेस बिनशर्त परवानगी दिली.भिलवडी परिसर व भिलवडी शिक्षण संस्था शोकसागरात बुडाली. डॉक्टरांच्या निधनाने भिलवडी शिक्षण संस्थेची अपरिमित हानी झाली होती. भिलवडी शिक्षण संस्थेच्या आवारात डॉक्टरांची समाधी बांधण्यात आली. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी भिलवडी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी आपले आयुष्य बहाल केले.डॉ.शेणोलीकरांच्या स्मृतिदिन विनम्र अभिवादन करीत आहोत.
*संकलन- संजय तावदर, भिलवडी*