
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) : –
विटा शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे, आपल्या मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे माजी आमदार स्व. हणमंतराव पाटील साहेब यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त विटा नगरपरिषद वतीने अभिवादन करण्यात आले. शहरातील शाळा क्र 2 येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकनेते हणमंतराव पाटील शाळा क्र. २ तसेच विटा नगरपरिषद येथील लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, शिक्षण सभापती डॉ. शिला भिंगारदेवे, नगरसेवक अमर शितोळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना नागराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे यांनी सांगितले की, साहेबांनी ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देत रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची त्यांची कार्यशैली आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या साध्या, प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जोडलेल्या नेतृत्वामुळे त्यांनी लोकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. विटा शहराच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी सर्व नगरपालिका पदाधिकारी,कर्मचारी,उपस्थित होते.